नवी दिल्ली वृत्तसंस्था । आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असून वित्तमंत्री निर्मला सीतारामन या बजेटवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी घेऊन संसदेत दाखल झाल्या आहेत.
आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर मोठा आघात झाला असून अलीकडे चिघळलेल्या कृषी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर या अर्थसंकल्पात नेमके काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी पावणे नऊच्या सुमारस अर्थमंत्री सीतारामन अर्थ मंत्रलयामध्ये पोहचल्या तेव्हा त्यांनी यंदाचा अर्थसंकल्प हा पूर्णपणे पेपरलेस असेल अशी माहिती दिली. नेहमीप्रमाणे खाता बही म्हणजेच कागदपत्रं असणारी बॅग आणण्याऐवजी यावेळी सीतारामन यांच्याकडे लॅपटॉप असल्याचं पहायला मिळालं. लाल रंगाचं कव्हर असणाऱ्या या लॅपटॉपवर राजमुद्रेचे चिन्हं होतं.
सीतारामन आणि अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर हे अर्थ मंत्रालयामधून संसदेत जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांनी करोनामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा पेपरलेस असणार आहे अशी माहिती दिली. या अर्थसंकल्पाची डिजीटल कॉपी ऑनलाइन उपलब्ध असेल.निर्मला सीताराम यांनी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अर्थसंकल्पावर स्वाक्षरी घेतली असून त्या संसदेत दाखल झाल्या आहेत.