मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात शेतकर्यांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत.
अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २२ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नियमित कर्ज फेड करणार्या शेतकर्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार असल्याची घोषणादेखील अजित पवारांनी केली. शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १ लाख या प्रमाणे ५ लाख सौर कृषीपंप बसवण्यात येणार आहेत. या योजनेसाठी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी अर्थसंकल्पात ६७० कोटी प्रस्तावित करण्यात आल्याचे ते म्हणाले. तर शेतीसाठी होणारा पाणी पुरवठा दिवसा करण्यावर भर देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. भूजल पातळी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री जलसंधारण योजना राबवण्यात येणार असून यासाठी १०,०३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर अल्पभूधारक शेतकर्यांना ठिबक सिंचनासाठी अल्पभूधारक शेतकर्यांना ८० टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणादेखील अजित पवार यांनी केली.