मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे खंदे शिलेदार माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी देखील आता शिंदे गटात प्रवेश घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फूट पडली असतांनाही अर्जुन खोतकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. ते आजवर मातोश्री सोबत असल्याचे मानले जात होते. तथापि, आज मात्र त्यांनी शिंदे गटाशी सलगी केल्याचे स्पष्ट झाले आहे. खोतकर आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत. मात्र खोतकर यांनी आज दिल्लीत दानवे यांची भेट घेतली. नंतर ते शिंदे आणि फडणवीस यांना भेटले. यामुळे आता ते शिंदे गटात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर, अर्जुन खोतकर यांनी मात्र आपण शिवसेना सोडली नसून आपण शिवसैनिकच असल्याचे म्हटले आहे. आपल्या पक्षांतराच्या बातम्या या अफवा आहेत असे ते म्हणाले. मात्र शिंदे गटातील बहुतांश सदस्य हेच म्हणत असल्याने खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांची सोबत घेतल्याचे दिसून आले आहे.