अमेरिकी आणि चिनी अधिकाऱ्यांची एकमेकांवर आगपाखड !

 

अलास्का : वृत्तसंस्था । अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या अमेरिका व चीन या  दोन आर्थिक महासत्ताच्या बैठकीमध्ये दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या विरोधी मत मांडल्याचे पहायला मिळालं

 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि चीनमधील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. . अलास्कामध्ये दोन दिवस चालणाऱ्या या चर्चासत्राच्या सुरुवातीलच अमेरिकन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या परराष्ट्र संबंधांविषयक प्रमुख यांग जियेची यांनी आपआपल्या देशाची भूमिका मांडतानाच समोरच्या देशातील धोरणांवर टीका केल्याचं पहायला मिळालं.

 

एखाद्या गंभीर राजकीय विषयावर समोरासमोर बसून चर्चा करताना अशाप्रकारे दोन मोठ्या देशांनी अशाप्रकारे टोकाची भूमिका घेणं हे दुर्मिळ मानलं जातं. दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आपले मुद्दे मांडले त्यावरुन व्यक्तिगत स्तरावरील चर्चा ही अधिक नाट्यमय होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांची परीक्षा घेणारी ही बैठक ठरणार असल्याची शक्यता या बैठकीपूर्वीच राजकीय जाणाकारांनी व्यक्त केली होती. या बैठकीच्या पहिल्याच दिवशी याची झलक पहायला मिळाली.

 

दोन्ही देशांमध्ये तिबेट, हाँगकाँग आणि चीनच्या पश्चिमेकडील शिनझियांग श्रेत्रातील व्यापार तसेच मानवाधिकारांच्या उल्लंघनासंदर्भातील मुद्द्यावर मतभेद दिसून आले. तैवान, दक्षिण चीनचा समुद्र आणि त्यामध्ये चीनचा वाढता प्रभाव याचबरोबर कोरोनाचा संसर्ग आणि जगभरामध्ये झालेला प्रादुर्भाव या मुद्द्यांवरुनही दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच वादळी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. बायडन प्रशासनाने ट्रम्प यांच्या कार्यकाळामध्ये अमेरिका आणि चीनमध्ये निर्माण झालेले तणावपूर्ण संबंध सुधरवण्याची तयारी दाखवली असली तरी चीनसंदर्भातील आक्षेपांची आणि ज्या मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत नाही अशा मुद्द्यांची यादीच या बैठकीमध्ये सादर केली.

 

ब्लिंकन यांनी बायडन प्रशासनाची चीनविरोधी भूमिका स्पष्ट शब्दांमध्ये मांडली. चीनच्या विस्तावरवादी प्रवृत्तीविरोधात अमेरिका इतर सहकारी देशांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे असं ब्लिंकन यांनी चिनी अधिकाऱ्यांना सांगितलं. यानंतर यांग यांनी अमेरिकेच्या भूमिकेसंदर्भात चीनला असणारे आक्षेप आणि इतर विषयांसंदर्भात चीनच्या भूमिकेपेक्षा अमेरिकीची भूमिका वेगळी कशी आहे याची यादीच वाचून दाखवली. अमेरिकेने मानवाधिकारांच्या मुद्द्यावरुन चीनवर आरोप केल्यासंदर्भातही यान यांनी आक्षेप नोंदवला. चीनने अमेरिकन लोकशाहीची सध्याची अवस्था, अल्पसंख्यांकाना दिली जाणारी वागणूक आणि जागतिक व्यापारासंदर्भातील विषयांवरुन अमेरिकेला सुनावलं. यांग यांनी जवळजवळ १५ मिनिटांचं भाषण दिलं. अमेरिकेकडून पैसा आणि लष्कराचा वापर करुन इतर लहान देशांवर दबाव निर्माण करण्याचा आरोप यांग यांनी आपल्या भाषणात केला.

 

या दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणवपूर्ण असून या देशांमधील बैठकीचा पहिला टप्पा पाहता दोन्हीकडील विरोधामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होणारं पाऊल या देशांकडून उचललं जाण्याची भीतीही काही जाणकारांनी व्यक्त केलीय.

Protected Content