जळगाव प्रतिनिधी । शहरातील प्रभाग क्रमांक १६ अर्थात देवीदास कॉलनी व लाठी शाळाजवळील परिसरात अमृत योजना व भुयारी गटारीचे काम अर्धवट काम सोडून दिल्यामुळे येथील नागरीकांनी संताप व्यक्त करत अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांनी आज शनिवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आरती ओवळली.
सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक १६ मधील देवीदास कॉलनी व लाठी शाळाजवळील परिसरात अमृत योजना व भुयारी गटारी काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान हे काम अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांनी अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे खराब रस्ते, खड्डे व धुळीमुळे नागरीकांचे आतोनात हाल होत आहे. बरेच नागरिक पावसामुळे होत असलेल्या खराब रस्त्यावरून खड्ड्यात पडत आहेत. त्यासंदर्भात नागरिकांनी आज नगरसेवक मनोज अहूजा, प्रकाश बालानी, नगरसेविका पती कुंदन काळे, तसेच अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांना समस्या मांडण्यासाठी आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजता बोलावले. नगसेवक आणि अधिकारी आल्यानंतर नागरिकांनी संताप व आक्रोश व्यक्त केला. अमृत योजनेच्या अधिकाऱ्यांची खराब रस्ते, खड्डे व खराब काम केल्यासाठी अक्षरशा आरती उतरविली. खराब कामांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे नागरिकांनी नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. नगरसेवक प्रतिनिधी वार्डातील काम पूर्ण करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांना पाठपुरावा करत नसल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे.