अमित शाह यांच्याकडूनही अर्नबची पाठराखण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

अमित शाह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली आहे. राज्याकडून रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात होणारा सत्तेचा गैरवापर हा लोकशाहीचा चौथा खांब आणि एका व्यक्तीच्या स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. यामुळे पुन्हा एकदा आणीबाणीची आठवण झाली आहे. प्रेसवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केलाच पाहिजे”.

पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.

पोलिसांनी रिपब्लिकचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि संजय पाठक यांना घरात जाण्यापासून रोखल्याचंही सांगण्यात आलं आहे. अटकेची कारवाई करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांच्या घराबाहेर पोलिसांची ८ वाहनं आणि ४० ते ५० कर्मचारी उपस्थित होते असा दावा आहे. निरंजन यांना रिपोर्टिंग करण्यापासून रोखण्यात आल्याचाही रिपब्लिकचा दावा आहे.

Protected Content