अमळनेर प्रतिनिधी । शहरातील केशवन नगरातील बंद घराचे कुलूप तोडून घरातील साडे तीन लाखाचे दागिने लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, ज्ञानेश्वर वसंत वारूळे (वय-६२) रा. साईलाल केशव नगर, अमळनेर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ते आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १६ डिसेंबर रोजी दुपारी १.३० ते ३.३० वाजेच्या दरम्यान कामाच्या निमित्ताने घराचा दरवाजा बंद करून बाहेर गेले होते. त्याच वेळेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागीने चोरून नेल्याचे समोर आले आहे. यात सुमारे ३ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल पोबारा केला आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर वारूळे यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक छत्रृध्न पाटील करीत आहे.