अमरावतीत हिंसाचारामुळे तणाव : जमावबंदी लागू

अमरावती प्रतिनिधी | त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला काल येथे हिंसक वळण लागल्याची प्रतिक्रिया आज उमटली असून आज येथे पुन्हा जमाव आक्रमक झाला आहे. यामुळे येथे कलम-१४४ लागू करण्यात आले आहे.

 

त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ काल समाजातील एक गटाने मोर्चा काढल्यानंतर लूटमार, जाळपोळ, आणि तोडफोड केल्याने वातावरण तणावग्रस्त झाले. याची प्रतिक्रिया आज उमटली असून कालच्या घटनेच्या निषेधार्थ आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. काल घडलेल्या हिंसाचारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी येथील भाजप नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

दरम्यान, जाळपोळ आणि हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात १४४ कलम लागू केले आहे. यानुसार पोलिसांनी जमावबंदी अर्थात कर्फ्यू लागू केला आहे. गृहमंत्र्यांनी या घटनेची दखल घेतली असून अमरावतीत कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्याचे निर्देश दिले आहेत.

Protected Content