जळगाव प्रतिनिधी । अभिजीत राऊत यांनी आज रात्री जळगावच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून स्वीकारला. काल रात्री उशीरा डॉ. ढाकणे यांच्या जागी राऊत यांच्या बदलीचे आदेश निघाले होते.
कोरोनाचा प्रतिकार करण्यात अपयश आल्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या जागी सांगली येथील जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत असणार्या अभिजीत राऊत यांनी बदली झाली होती. आज सायंकाळी ते आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती समोर आली होती. तथापि, त्यांना सांगली येथून येण्यासाठी थोडा विलंब झाल्यामुळे आज रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडून जळगावच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ बी एन पाटील, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्यासह महसूल, आरोग्य व इतर विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.