जळगाव प्रतिनिधी । आपल्या कुटुंबियांसोबत पायी घरी जाणार्या अल्पवयीन मुलीस एका दुचाकीस्वाराने पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार काल मंगळवारी दुपारी घडला होता. दरम्यान आज सकाळी अमरावती ग्रामीणचे लोणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुखरूप मिळून आली असून मुलीला घेण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, लॉकडाऊनमुळे अनेक जण आपापल्या घरी पायी निघालेली आहेत. असेच एक कुटुंब हे मुलूंड येथून अकोला जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी निघाले होते. काल नशिराबाद ते भुसावळ हायवे क्रमांक ६ वर जेवण करून सावलीत मोठे वाहनाचे टायर फुटले असल्याने दोन तास दुरुस्ती करिता लागणार आहेत म्हणून थांबलेले दोघे १९ वर्षाचा भाऊ व १२ वर्षाची अल्पवयीन मुलगी उभे असतांना दुपारी ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराने त्यातील अल्पवयीन मुलगी (वय १२) आणि तिच्या भावाला दुचाकीवरून भुसावळला सोडून देण्याचे सांगत आपल्या बाईकवर बसविले. यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ त्याने त्या मुलीच्या भावाला उतरवून दिले. पुढे पोलीस असल्याने तू पायी आम्हाला येऊन भेट असे सांगत त्याने संबंधीत मुलीस घेऊन गाडी पुढे नेली. दरम्यान, तो मुलगा पायी पुढे गेल्यानंतर त्याला दुचाकीस्वार गायब झालेला दिसला. यावरून नशिराबाद पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पोलिस यंत्रणा राबवून भुसावळ ते आकोला दरम्यान नाकाबंदी लावून पथक रवाना केले होते. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास अमरावती ग्रामीण लोणीचे पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुखरूप मिळून आली. दरम्यान मुलीला घेण्यासाठी जळगावातील पोलीस पथक रवाना झाले आहे.