नवी दिल्ली वृत्तसंस्था । काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये तर बाधितांच्या संख्येनं ८० हजारांचा टप्पा पार करत उच्चांक गाठल्याचं दिसून येतंय. अन्य देश कोरोनावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी ठरले तर भारताला का यश मिळालं नाही,” असा सवाल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.
“भारत हा जगातील एकमेव देश आहे ज्याला लॉकडाउनच्या रणनितीचा फायदा उठवता येत नाहीये . २१ दिवसांमध्ये मात करू असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं. परंतु अन्य देश यात यशस्वी झाले तर भारत का अयशस्वी झाला हे पंतप्रधानांनी सांगितलं पाहिजे,” असं चिदंबरम म्हणाले.
मी भविष्यवाणी केली होती की ३० सप्टेंबरपर्यंत बाधितांची संख्या ५५ लाखांपर्यंत पोहोचेल. परंतु मी चुकीचा ठरतोय. भारत २० सप्टेंबरपर्यंतच त्या संख्येपर्यंत पोहोचेल. सप्टेंबरच्या अखेरिस ही संख्या ६५ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
देशातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४० लाखांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत देशात ८६ हजार ४३२ नवीन करोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. महाराष्ट्रा, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्याचं दिसत आहे.