पाचोरा, प्रतिनिधी । भाजप नेते आशिष शेलार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून अनिल महाजन यांनी शेलार यांच्यावर टीका केली आहे
भाजपमध्ये आमचे नाथाभाऊ नसते तर तुम्ही आणि तुमचे मित्र आजही डाळ भात खाऊन हाफ चड्डी वर कुठे तरी कवायत करत दिसले असते. आमदार, मंत्री झाले नसते हे नाथाभाऊ यांचे उपकार तुम्ही विसरू नये. आशिष शेलार यांनी जळगावच्या स्थानिक राजकारणात डोके घालू नये . एकनाथराव खडसेबद्दल बोलण्याएवढे तुम्ही मोठे नाहीत. एकनाथराव खडसे यांनीच महाराष्ट्रमध्ये भाजप वाढवली नाथाभाऊ भाजप मध्ये होते म्हणून तुमच्यासारखे भाजपचे कार्यकर्ते मंत्री पदापर्यंत पोहचू शकले हे विसरू नये. नाथाभाऊ गेले चाळीस वर्ष जनतेतुन निवडून येणारे नेते आहेत तुमच्यासारखे आयत्या बिळावर नागोबा झालेले नाहीत अनेक कार्यकर्त्याना त्यांनी नेता बनवले आहे तुम्ही तुमचा स्वतःचा मतदारसंघ बांद्रा वेस्ट बघा. त्याठिकाणी अपूर्ण विकासकामे पूर्ण करा. जळगावमध्ये येऊन खान्देशच्या लोकांना ज्ञान देऊ नये. नाथाभाऊ यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा तुमच्या राज्यपालांना सांगा मंत्रीमंडळाने शिफारस केलेली १२ लोकांची विधानपरिषद साठी दिलेले आमदारांची लिस्ट जाहीर करा ते तुम्ही करणार नाहीत. कारण नाथाभाऊ विधानसभेत आल्यावर तुमच्या एकेकाच्या कुंडल्या अधिवेशनात काढतील म्हणून तुम्ही राज्यपाल यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून नाथाभाऊंना आमदार होऊ देत नाहीत त्यामुळे शेलारजी तुम्ही पतिव्रतेचा आव आणू नका , अशी टीका अनिल महाजन यांनी केली .
जे चोर आहेत त्यांच्यामागे ईडी लागते असे तुम्ही म्हणता. केंद्रात भाजपचे सरकार आहे आणि केंद्रीय यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत हे देशात सर्वांना माहीत आहे. भाजपमध्ये चोर नाहीत का ? भाजपच्या लोकांवर गुन्हे दाखल नाहीत का ? भाजप नेत्यांचे घोटाळे आहेत त्यांची का नाही ईडी चौकशी करत ? भाजपमधील काही लोकांचीसुद्धा ईडी चौकशी सुरू आहे. मग हे लोकही चोर आहेत का ? याचे ही उत्तर द्या , असेही ते म्हणाले .
जो भाजपमध्ये आहे त्याच्यांवर कारवाई होणार नाही. अशी रणनीती आखून आपण राजकारण करत आहात. हे लोकशाहीला धरून नाही असे टिकास्त्र अनिल महाजन यांनी सोडले आहे.