मुंबई : वृत्तसंस्था । भाजपाने आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपाचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहे. आरोपांचं पत्र समोर आल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेत देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहेत, असं म्हणत देशमुखांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.
आंदोलनावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,”मी दोन तीन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. ते माहितीच्या आधारेच सांगितलं होतं की, दोन मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्याप्रमाणे अनिल देशमुखांचा राजीनामा आज घेतला पाहिजे. नीतिमत्तेची चाड असेल, तर उद्धव ठाकरे देशमुखांचा राजीनामा घेतील. उद्धवजींना माझं आवाहन आहे की, आमचा विषय नाहीये. शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. संजय राठोडांचा राजीनामा घेतला जात असेल आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जात नाही. वाझेंना निलंबित केलं जात आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येकवेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर दबाब निर्माण करतेय की, सरकारची प्रतिमा बिघडतेय राठोडांचा राजीनामा घेतला , . मग मुंडेंमुळे सरकारची प्रतिमा डागाळली जात नाही का? त्यामुळे देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. केवळ देशमुखच नाही तर शिवसेनेचे मंत्री गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल दोन दिवसांपूर्वी शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. ते मंत्री कोण आहेत, त्यांचं नावही समोर आलं आहे. त्यामुळे मी दोन मंत्री म्हणालो होतो, दुसरे ते आहेत,” असं पाटील म्हणाले.
“परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप लगावले आहेत. ते अतिशय निंदनीय आहेत. आता हे स्पष्ट झालं आहे की, ठाकरे सरकार भ्रष्ट आहे. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांनीच नव्हे तर संपूर्ण ठाकरे सरकारने सत्तेतून पाय उतार व्हावं. महाराष्ट्राच्या राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालेलं आहे, हे या ठाकरे सरकारने पदोपदी सिद्ध केले. अनिल देशमुख हे सचिन वाझेंना महिना १०० कोटी रुपयांची वसुली करायला सांगायचे. पोलिसांना वसूली करायला लावणारा गृहमंत्री महाराष्ट्र कदापी सहन करु शकत नाही,” असंही पाटील यांनी म्हटलं आहे.