मुंबई, वृत्तसेवा । मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेचे मुख्य समन्वयक रमेश केरे यांनी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही न झाल्याने उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे याबाबत लेखी पत्र देऊन मागणी केली.
रमेश केरे यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला एक पत्र पाठवलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत विनायक मेटे यांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर दिलं होतं. यात मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलक उमेदवारांना सरकारी नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात न्यायालयीन बाजू तपासून घेण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या आश्वासनामुळेच आझाद मैदानवरील आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत यावर कोणतीही बैठक अथवा निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या निकालाची सुनावणी ७ जुलैला होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने आपली बाजू कोर्टात मांडण्यासाठी काय तयारी केली? याची माहिती मराठा समाजाला मिळावी अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा संघटनेनं केलीये. यासाठी मराठा आरक्षण उपसमितीची बैठक अद्यापही आयोजित करण्यात आलेली नाही. बैठकीचं आयोजन करण्यात येणार नसेल तर अशोक चव्हाण यांना उपसमितीच्या अध्यक्ष पदावरुन हटवून त्यांच्याजागी उपसमितीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटील किंवा एकनाथ शिंदे यांना अध्यक्ष म्हणून निवडावे असंही रमेश केरे म्हणाले.