जळगाव प्रतिनिधी । शहरातील राजकमल टॉकिजसमोर महापालिकेच्या वतीने अतिक्रमणची कारवाई करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी ११. ३५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एकावर दुपारी ४ वाजता शनीपेठ पोलीसात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, सोमवारी १९ जुलै रोजी सकाळी ११. ३० वाजेच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील राजकमल टॉकीज जवळ अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. राजकमल टॉकीज समोर असलेले पुणेरी अमृततुल्य चहाच्या दुकानासमोर अतिक्रमण विभागाचे कर्मचारी कारवाई करत असतांना नुर महोम्मद शेख जब्बार (वय-१९) रा. तांबापूरा जळगाव या तरूणाने महापालिकेच्या कंत्राटी कर्मचारी शुभम आनंदा सपकाळे (वय-२१) रा. चौघुले प्लॉट जळगाव यांना बशिवीगाळ करून मारहाण केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. शुभम सपकाळे यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नुर मोहम्मद शेख जब्बार यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहे.