राळेगणसिध्दी । केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्राने याबाबत समिती नेमण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे. या माध्यमातून भाजपला अण्णांची मनधरणी करण्यात यश मिळाल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गांधी जयंतीपासून केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आमरण उपोषणाची घोषणा केली होती. आधीच हा मुद्दा चिघळला असून याला हिंसक वळण लागले आहे. यातच अण्णांनी उपोषण केले तर केंद्र सरकार समोरील अडचणी वाढण्याची शक्यता होती. या बाबींना लक्षात घेऊन भाजप नेत्यांनी कधीपासूनच त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले होते. मात्र अण्णांनी याला प्रतिसाद दिला नव्हता.
या पार्श्वभूमिवर, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिध्दी येथे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासह भेट घेतली. याप्रसंगी अण्णांनी केलेल्या मागण्या केंद्र सरकार मान्य करणार असून यासाठी समिती नेमत असल्याचे आश्वासन दिले. यामुळे अण्णांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे.