अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, जयंत पाटलांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 

 

जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अण्णाभाऊ यांचे साहित्य गोरगरीब, कष्टकरी, श्रमकरी वर्गाच्या हक्क-अधिकारांची जाणीव निर्माण करणारे आहे. त्यांच्या साहित्यातील नायक-नायिका सत्वशील, स्वाभिमानी आणि अन्यायाविरुध्द लढणारे आहेत. समाजाची दुसरी बाजू दाखवणाऱ्या, त्याचे प्रश्न मांडणाऱ्या अण्णाभाऊंना भारतरत्न मिळायलाच हवा. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल अशी भावनाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ हे जागतिक किर्तीचे प्रतिभासंपन्न साहित्यिक होते. कथाकार, पटकथाकार, शाहीरी, नाटक, लोकनाट्य, प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकार त्यांनी शब्दबध्द केले आहेत. एकही दिवस शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंनी विश्व साहित्यात आपला ठसा उमटवला असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Protected Content