चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील वयोवृद्धा हा दुचाकीने चाळीसगावाकडे येत असताना भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शहरातील बालाजी नगर जवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथील कमलाकर काशीराम जंगले (वय-६२) हे आपल्या दुचाकीवरून (क्र. एम.एच.१५ ए.एफ. ८७५८) मालेगाव कडून चाळीसगावाकडे येत असताना अचानक अज्ञात भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार कमलाकर काशीराम जंगले हे जागीच ठार झाले. हि घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास मालेगाव – चाळीसगाव रोडवरील बालाजी नगराजवळ घडली. घटना घडताच अज्ञात वाहन धारक हा पसार झाला. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. अकस्मात मृत्यूच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर मुलगा राकेश कमलाकर जंगले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटार वाहन कायदा १८४,१३४(ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास मुकेश पाटील हे करीत आहेत.