नवी दिल्ली- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसंस्था । गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर आज मोकळा झाला आहे. सर्वोच्य न्यायालयात यासंदर्भात झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्याबाबत निर्देश दिले आहेत.
एकीकडे राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेपाटपाची चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे सर्वोच्य न्यायालयात आज विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्ती संदर्भात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या नियुक्त्या करण्याबाबतचे निर्देश दिले आहे. यामुळे लवकरच राज्यपालांकडून या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता विधान परिषदेत कुणाची वर्णी लागणार, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.
महाविकास आघाडीच्या कार्यकाळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत १२ आमदारांच्या नियुक्तीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. राज्यपालांनी हेतूपुर्वक ही यादी मंजूर केली नसल्याचा आरोप महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला होता. यामुळे या आमदारांची नियुक्ती रखडली होती. आज सुप्रीम कोर्टाने याबाबत निकाल दिल्याने आता १२ आमदारांची नियुक्ती होणार आहे. तथापि, आदी दिलेली यादी मंजूर होणार की आता नव्याने यादी दिली जाणार हा मुद्दादेखील महत्वाचा ठरणारा आहे.