जळगाव, प्रतिनिधी | मनपातील बोगस नियुक्ती व व उड्डाण पदाेन्नती प्रकरणात नियुक्ती रद्दचे अादेश नगरविकास विभागाने दिले आहेत. याला विरोध करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर आज महापौर जयश्री महाजन यांनी कर्मचाऱ्यांची बैठक घेवून त्यांची बाजू पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार असल्याचे सांगितल्याने या कमर्चारी व अधिकाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.
या बैठकीला महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, जेष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा, कर्मचाऱ्याकडून उदय पाटील, राजेंद्र पाटील, व्ही. ओ. सोनवणी, एस. एस. पाटील आदी सहभागी झाले होते.
७१६ कर्मचाऱ्यांवर नगरविकास विभागाने नियुक्ती रद्द करण्याची अथवा पदावनत करण्याची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यात काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काही निवृत्तीच्या टप्प्यावर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आपण असल्याची ग्वाही देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कर्मचाऱ्यांची बाजू मांडणार असल्याचे महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले.
उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी राज्य शासन कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक कारवाई करणार असेल तर त्याविरोधात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दाद मागण्यात येवून कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होवू देणार नसल्याचे सांगितले.
नितीन लढ्ढा यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापौर, उपमहापौर ते स्वतः पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांची बाजू मांडण्यात आली. यावेळी ना.पाटील कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रतिनिधीनी निवेदन राज्य शासनाकडे द्यावे असे सूचित केले. आदेशावर स्थगिती देण्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वसन दिले. ना. पाटील यांनी स्थगितीच नाही हे प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यातबाबत पाठपुरावा करणार आहेत.
हा शासनाचा निर्णय आला नसून तर आणला गेला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केला आहे. हा निर्णय आणणाऱ्यांची खैरे केली जाणार नाही असा दम त्यांनी दिला आहे. काही निवृत्ती अधिकारी दलाली करतील त्यांना भिक घालू नका. मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, पालकमंत्री शिवसेनेचे असल्याने दलाल प्रवृतीला मुळीच भिक घालू नका असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मनपा अधिकारी उदय पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर विश्वास दाखवत आंदोलन मागे घेत असल्याचे सांगितले.