पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका ठेकेदाराकडून केलेल्या कामाच्या बिलापोटी नगरपालिका प्रशासन अवाजवी रक्कमेची मागणी करत असल्याने संबंधित ठेकेदार सुरेश (पप्पु) पाटील यांनी २१ सप्टेंबर सकाळी ११ वाजेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले होते. अखेर आज २५ सप्टेंबर रोजी बाकी असलेल्या बिलापोटी २ लाख रुपयांचा धनादेश व उर्वरित रक्कम ही डिसेंबर – २०२३ अखेर पर्यंत टप्प्या टप्प्याने अदा करण्यात येण्याचे आश्वासन नगर पालिकेच्या मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
याप्रसंगी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, मा. नगरसेवक विकास पाटील, सुनिल शिंदे, भरत खंडेलवाल, गणेश परदेशी, फईम शेख, बाबाजी ठाकरे, रणजीत पाटील उपस्थित होते. या आमरण उपोषणास मा. आ. दिलीप वाघ, उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी, अॅड. अभय पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, नगरपालिकेचे मा. गटनेते संजय वाघ, छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, समता सैनिक दलाचे किशोर डोंगरे, क्षत्रिय गृपचे धनराज पाटील, अखिल मराठा समाज प्रतिष्ठान, बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, पाचोरा तालुका पत्रकार संघ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विशाल बागुल, महासचिव दिपक परदेशी, पी. डी. भोसले त्यांचेसह विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला होता.
येथील सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस या फर्मने पाचोरा नगरपरिषदेस जंतूनाशके पुरविणे व घंटगाडया दुरुस्ती करणे अशी पुरवठा व सेवेची कामे केलेली असुन ३ एप्रिल २०२३ रोजी एकूण झालेल्या १५ लाख ६ हजार ३०० रुपयांपैकी बिलापोटी ६ लाख रुपये नगरपरिषद प्रशासनाने अदा केलेले आहेत. परंतु उर्वरीत बिलासाठी गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून वारंवार नगरपरिषदेकडे पाठपुरावा करत बिलाची मागणी केली असता अगोदर ३० टक्के प्रमाणे २ लाख ७० हजार रुपये रोखीने लेखाविभागात जमा करा अन्यथा बिल मिळणार नाही. इतक्या मोठ्या रक्कमेची तरतूद करून दिल्यास संस्थेला मोठे नुकसान होईल.
संस्थेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने खूप मानसिक तान सहन करावा लागत आहे. इतर बिले वेळेवर अदा केली जात असून पैसे न दिल्यामुळे अडवणूक केल्याचे निदर्शनास येत आहे. यापूर्वी लोकप्रतिनिधी असतांना अशी अडचण आलेली नाही परंतु प्रशासक काळात अशा प्रकारे अवाजवी पैश्यांची मागणी होत असल्याने २१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून सिटी वेस्ट मॅनेजमेंट सेल्स अँन्ड सर्व्हिसेस चे सुरेश (पप्पु राजपुत) गणसिंग पाटील यांनी पाचोरा उपविभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते.