जळगाव , प्रतिनिधी । महाराष्टातील अकृषी विद्यापीठांना सातवा वेतन आयोग अद्यापही लागू झाला नसून त्वरित लागू करण्यात यावा अशी मागणी मागासवर्गीय कर्मचारी संघटना उपाध्यक्ष विकास देवराम बिऱ्हाडे यांनी ई-मेलद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग अद्याप पावेतो लागू झालेला नाही. यास्तव सर्व विद्यापीठ कर्मचारी संघटना व महासंघ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. कृती समितीच्या माध्यमातून टाळेबंदीपूर्वी, दिनांक १३, मार्च रोजी कृती समितीच्या मुंबईतील प्रतिनिधींनी मंत्रालयात जाऊन पाठपुरावा केला असता राज्यातील अकृषी विद्यापीठांना ७वा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा शासन निर्णय तयार असून केवळ वित्त विभागाच्या अभिप्राय करीता सादर करण्यात आल्याचे सूचित केले होते. असे असताना दुर्दैवाने कोरोना आजाराचा फैलाव वाढत असल्याने महाराष्ट्र शासनाने लॉकडाऊन घोषित केले त्यामुळे आपल्या ७व्या वेतन आयोगाच्या पाठपुराव्यामध्ये खंड पडला होता. आता शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कृती समितीच्या प्रयत्नांबरोबर मा. आमदार दत्तात्रय अच्युतराव सावंतजी, श्रीकांत देशपांडे, बाळाराम पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नाने राज्यातील अकृषी विद्यापीठांना ७वा वेतन आयोग लवकरच लागू होईल अशी आशा निर्माण झाली. त्वरित अकृषी विद्यापीठांच्या कर्मचाऱ्यांना ७ वेतन आयोग लागू करावा अशी मागणी विकास बिऱ्हाडे यांनी केली आहे. दरम्यान, अकृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल करून सातवा वेतन आयोग अशी मागणी करावी असे आवाहन उपाध्यक्ष विकास बिऱ्हाडे यांनी केले आहे.