अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, शबरी घरकुल योजना, पारधी आवास योजना, तसेच रमाई आवास योजनेतून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सन २०१६/१७ पासून गावातील सुमारे २००हून अधिक लाभार्थ्यांची या योजनेमध्ये नावी समाविष्ट करण्यात आलेली आहेत.
सद्यस्थितीत शंभर ते सव्वाशे घरकुलांचे कामे पूर्णत्वास आलेली आहेत. परंतु अपुरा निधी, जागेची अडचण, तसेच वाळू मिळण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. किमान 55 ते 60 लाभार्थ्यांनी अजूनही घरकुलांची कामे सुरू केलेली नाहीत. परिणामी पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीमार्फत सदर लाभार्थ्यांना वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्याच अनुषंगाने शेवटच्या टप्पा म्हणून शासकीय निधीचा गैरवापर म्हणून त्या लाभार्थ्यांवर फौजदारी गुन्हा जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये दाखल झालेले आहेत. परंतु हा निधी सध्याची महागाई बघता खूपच कमी असल्याने येथील किमान अकरा लाभार्थ्यांनी दोन लाख दहा हजारांचा एवढा निधी ग्रामपंचायत मार्फत शासनास परत केलेला आहे. शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही किमान अडीच लाखांचा निधी मिळण्यात यावा असे अनेक लाभार्थ्यांनी सांगितल्याचे सरपंच जगदीश निकम उपसरपंच जितेंद्र सिंग पाटील यांनी सांगितले. अजूनही बरेच लाभार्थी सदर निधी परत करण्याच्या तयारीत आहेत असेही त्यांनी सांगितले..
ही आहेत प्रमुख कारणे –
वाळूचा खर्च परवडेनासा-प्रति ट्रीपला चार ते पाच हजार रुपयांचा खर्च,
भर साठी लागणारे गौण खनिज-प्रति ट्रिप,दीड ते दोन हजार रु.खर्च
सातत्याने घरकुल चा प्रत्येक चेक काढण्यासाठी दिली जाणारी खुशाली वेगळी
या डोकेदुखी मुळेच लाभार्थ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची खमंग चर्चा सद्या सर्वत्र सुरू आहे.
या लाभार्थ्यांनी केला निधी परत
मधुकर पाटील, विमलबाई सुतार, शांताराम महाजन, जयंताबाई महाजन, विठ्ठल कुंभार, विजय कुंभार, मंगलबाई शांतराम महाजन, रविंद्र पाटील, मखमलबाई महाजन, तुळशीराम महाजन, निवृत्ती चौधरी यांनी शासनाकडून आलेला निधी परत केला आहे.