जळगाव प्रतिनिधी । कोरोना संकटाच्या लॉकडाउनच्या काळातच मोदी सरकारने शेतकरी व कष्टकऱ्यांना त्रासदायक ठरतील असे तीन अध्यादेश काढले आहेत. या सरकारला कधीच शेतकऱ्यांची काळजी नव्हती हे त्यांच्या आतापर्यंतच्या धोरणावरून दिसून आले आहेच. सरकारने मनरेगा मधून कोरोना संकटाच्या लॉकडाउनच्या काळात शेतीसाठीची कामे पूर्ण करण्यासाठी शेतमजुरांना किमान २०० दिवसांची कामे द्यायला हवी होती पण शंभर दिवसही ते काम देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे आजच्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही त्यांना हेच सांगत आहोत कि, अंबानी , अदानींची नव्हे, मोदी शेतकरी, सामान्यांची काळजी घ्या, असे प्रतिपादन आज लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केले. ९ ऑगस्ट च्या किसान मुक्ती दिनाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने जळगावात आल्यावर त्या लाईव्ह ट्रेंड न्यूज शी बोलत होत्या.
या आंदोलनाबद्दल बोलताना लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे पुढे म्हणाल्या कि , जळगाव जिल्ह्यात सुमारे चारशे , उत्तर महाराष्ट्रात सहाशे आणि गुजरात राज्यातही सुमारे सातशे गावांमध्ये आज शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मोदी सरकारने सत्तेवर येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन दंश चालवू असे सांगितले होते सुराज्य आणू असे ते म्हणाले होते आणि आजची परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे . जिल्ह्यातील मका खरेदीच्या प्रश्नावर लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी उपोषणाला बसणार होते, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने त्यांना नोटीस पाठवली आहे. हजारो टन मका खरेदी न झाल्याने जिल्ह्यात पडून आहे . सगळेच शेतकरीविरोधी निर्णय आणि कायदे मागे घ्या हि आमची मुख्य मागणी आहे, असेही त्या म्हणाल्या.
कर्नाटकातील शिवाजी महाराजांचा पुतळा एक रात्रीतून हटविण्याच्या कर्नाटक सरकारच्या भूमिकेचाही त्यांनी निषेध केला आणि सन्मानपूर्वक हा पुतळा ज्या ठिकणी होता त्याच ठिकाणी पुन्हा बसवून द्यावा, या मागणीसाठी सीमाभागात होणाऱ्या आंदोलनाला आपण पाठिंबा देत असल्याचे त्या म्हणाल्या.