पुणे प्रतिनिधी । केंद्रातील मोदी सरकार हे अडाणी-अंबानी यांच्या सारख्या उद्योगपतींचे पाठीराखे असल्याचा आरोप करून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले आहे.
आज पुणे येथील पत्रकार परिषदेत बोलतांना येत्या २२ डिसेंबर रोजी मुंबईत मुकेश अंबानी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय ते बीकेसीतील रिलायन्सच्या ऑफीसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. यात अपक्ष आमदार बच्चू कडू आणि बाबा आढाव देखील सहभागी होणार असल्याचंही शेट्टी यांनी सांगितलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या मोर्चात सहभागी व्हावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
केंद्र सरकारला जर शेतकर्यांना खरंच काही द्यायचं असेल तर हमीभाव द्या. उगाच त्यांच्यावर नको असलेले कायदे लादू नका, असं राजू शेट्टी म्हणाले. यासोबतच मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाही एकत्र असल्याचं शेट्टी म्हणाले. केंद्रातील मोदी सरकार हे उद्योगपतींचे पाठीराखे असून त्यांचा निषेध करण्यासाठीच हा मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती देखील शेट्टी यांनी याप्रसंगी दिली.