मुंबई वृत्तसंस्था । पदवीच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पदवीच्या केवळ अंतिम वर्षांचीच परीक्षा होणार आहे. असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले. बाकी सर्व वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून नवीन वर्गात प्रवेश मिळणार आहे. मात्र नापास झालेले विषय पुढील परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आधी कमी गुण मिळाले असतील तर ऐच्छिक परीक्षा देण्याचीही मुभा देण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्देशांनुसार सर्व निर्णय घेण्यात येत असल्याचेही सामंत यांनी स्पष्ट केले.
राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम परीक्षा १ ते 31 जुलै दरम्यान होतील. मात्र लॉकडाऊनची स्थिती कायम राहिल्यास २० जूनच्या आसपास बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा-महाविद्यालय बंद आहेत. शालेय विद्यार्थ्यांना याआधीच पुढील वर्गात प्रवेश मिळाला आहे. मात्र कॉलेज विद्यार्थ्यांवर टांगती तलवार होती.
बीए, बीकॉम हे तीन वर्षांच्या कालावधीचे अभ्यासक्रम आहेत. त्यात सहा सत्र असतात. या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा फक्त होणार आहे. जिथे 8 सेमिस्टर आहेत, तिथे आठव्या, दहा सेमिस्टर असतील, तिथे दहाव्या सेमिस्टरची परीक्षा घेतली जाणार आहे. एमए, एमकॉम आणि दोन वर्षांचे जे अभ्यासक्रम आहेत, त्याला चार सेमिस्टर आहेत. तिथे चौथ्या सेमिस्टरची परीक्षा होणार आहे. डिप्लोमाचा कालावधी तीन वर्षांचा, म्हणजे सहा सेमिस्टरचा आहे. त्याच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा होईल, असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.