अंतिम वर्षाच्या परिक्षांसह इतर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध: कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने अभ्यासक्रम व सत्रनिहाय आयोजित होणाऱ्या आणि न होणाऱ्या परीक्षांचा तसेच निकाल जाहीर करण्याची पद्धत व पुढील वर्गाच्या प्रवेशाबाबतचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद् केला आहे. होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप मात्र यथावकाश कळविले जाणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारला असून या अहवालात परीक्षा आयोजनासंदर्भातील शिफारशींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी. पाटील यांनी परिपत्रक काढले आहे.या परिपत्रकात म्हटले आहे की, दि. १ ते ३१ जुलै दरम्यान शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये पदविका,पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या विषयासह मागील सत्रातील अनुत्तीर्ण असलेल्या विषयांची परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच अंतिम वर्षातील पुनर्रपरीक्षार्थी(रिपीटर) विद्यार्थ्यांनी अनुत्तीर्ण असलेल्या विषयांची परीक्षा ( बॕकलाॕगसह) घेतली जाईल.

परीक्षांच्या आयोजनाची पद्धत, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, परीक्षा कालावधी बाबत यथावकाश कळविले जाईल.वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यथावकाश उपलब्ध करून दिले जाईल. परीक्षांसाठी १३ मार्च २०२० पर्यंत नियमित वर्ग अध्ययनातून पूर्ण झालेला अभ्यासक्रम ग्राह्य धरण्यात येईल.टाळेबंदीचा कालावधीत हा त्या विद्यार्थ्यांचा उपस्थिती कालावधी म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून इतर विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही.मात्र त्यांचा विषयनिहाय निकाल हा ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनावर आधारित व ५० टक्के लगतच्या परीक्षेच्या गुणांच्या आधारे जाहीर करण्यात येईल. ज्या अभ्यासक्रमांना वार्षिक परीक्षा पद्धत लागू आहे अशा अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांचे जर पूर्वीच्या परीक्षेच्या किंवा सत्राचे गुण उपलब्ध नसल्यास शंभर टक्के अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर होईल.

ज्या अभ्यासक्रमाचे अंतर्गत मूल्यमापन कामकाज अपूर्ण असेल किंवा प्रात्यक्षिक /मौखिक परीक्षा, प्रकल्प अहवाल कामकाज अपूर्ण असेल त्याबाबत परीक्षा आयोजन, मूल्यमापन व गुणदानाबाबतच्या कार्यपद्धती यथावकाश कळविण्यात येईल. अंतिम वर्षातील विद्यार्थी वगळून परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण असेल तरी त्यास पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश कॕरीफाॕरवर्ड पद्धतीने देण्यात येईल. ही सवलत फक्त शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करिता लागू राहिल.उन्हाळी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण विषयांची परीक्षा तसेच प्राप्त श्रेणी / गुणांमध्ये सुधारणा करायची असेल तर पुढील शैक्षणिक वर्षात परीक्षा देता येईल. तपशीलवार परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Protected Content