अंतिम वर्षांच्या वैद्यकीय परीक्षांना स्थगितीस हायकोर्टाचा नकार

मुंबई वृत्तसंस्था । मेडिकल पदवीच्या विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या मंगळवारपासून सुरू होत असलेल्या परीक्षांना स्थगिती देण्यास शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला.

 

कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर जाऊन परीक्षा देणे विद्यार्थ्यांसाठी धोक्याचे आहे, असे याचिकादार विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मात्र, याचिकादार हे अत्यंत शेवटच्या क्षणी येऊन स्थगिती मागत असल्याने ती विनंती मान्य करता येणार नाही, असे न्यायालयाने अंतरिम आदेशात स्पष्ट केले.

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अहमदनगर, नागपूर अशा विविध भागांतील रहिवासी असलेल्या नऊ विद्यार्थ्यांनी अॅड. संकेत भांडारकर व अॅड. कुणाल कुंभाट यांच्यामार्फत ही तातडीची जनहित याचिका केली ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सुनावणी झाली. सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करूनच राज्य सरकार व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याची तयारी केली असल्याचे मुख्य सरकारी वकील पी. पी. काकडे व सरकारी वकील मनीष पाबळे यांनी न्या. अमजद सय्यद व न्या. सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठाला सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाने नीट व जेईई परीक्षेला स्थगिती देण्याची विनंती नुकतीच फेटाळली असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. नऊ विद्यार्थ्यांनी केलेली ही याचिका सर्वच विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व मानले जाऊ शकत नाही, असा युक्तिवादही त्यांनी मांडला

‘महाराष्ट्रात आजही करोनाची स्थिती गंभीर असून एकूण रुग्णांचा आकडा जवळपास आठ लाखांच्या घरात आहे. त्यातील जवळपास दोन लाख हे सक्रिय रुग्ण आहेत आणि २५ हजारच्या घरात मृत्यू झाले आहेत. ऑफलाईन पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्याच्या विद्यापीठाच्या २१ ऑगस्टच्या परिपत्रकाला तातडीची स्थगिती देण्यात यावी’, अशी विनंती याचिकादारांच्या वकिलांनी केली होती.

Protected Content