भुसावळ प्रतिनिधी । आपला जीव धोक्यात टाकून कोरोना योध्याचे काम करणार्या अंगणवाडी कर्मचार्यांना प्रांताधिकारी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप अंगणवाडी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी केला असून हा प्रकार बंद करण्यात यावा अन्यथा काम बंद करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
या संदर्भात रामकृष्ण पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिवाची पर्वा न करता अंगणवाडी केंद्राचे नियमित काम सांभाळून प्रशासनाच्या तोंडी आदेशानुसार भुसावळ शहरातील अंगणवाडी कर्मचारी गेल्या तीन महिन्यापासून कोरोनाचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून न. पा. आरोग्य विभागाला दररोज माहिती देत आहेत. हे काम करतांना वेळोवेळी लेखी व तोंडी मागणी करूनही अंगणवाडी कर्मचार्यांना मास्क, सँनिटायझर, ग्लोव्हज आदी सुरक्षिततेचे साहित्य आजतागायत देण्यात आले नाही. दरम्यान, गरोदर, वयस्क, अपंग, मधुमेह, रक्तदाब, दमा यासह अन्य व्याधी असलेल्या अंगणवाडी कर्मचार्यांनी वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे कागदपत्रे दाखवूनही अशा महिला कर्मचार्यांना कोरोनाच्या कामाची सक्ती प्रातांधिकारी यांच्याकडून केली आहे. त्यामुळे कर्मचार्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडी केंद्राचे टीएचआर वाटप करणे, ऑनलाइन लाभार्थ्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणे, अंगणवाडी केंद्राची माहिती दररोज सीएएस मध्ये भरणे, आदी कामे सुरू असतांना कोरोनाच्या तपासणी दररोज प्रत्येकाने किमान पाच ते दहा व्यक्तिंना स्वँब देण्यासाठी कोवीड सेंटरला पाठवलेच पाहिजे. अन्यथा तुमच्यावर एफआयआर दाखल करू अशा सक्त धमक्या प्रांताधिकार्यांकडून दिल्या जात आहेत.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, यामुळे अंगणवाडी कर्मचार्यांना केंद्राचे काम करावे कि कोरोनाचे करावे असा संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच एफआयआरच्या धमक्यामुळे मानसिक दडपणाखाली काम करीत आहेत. त्यामुळे कोरोनाचे नियमित काम करूनही प्रातांधिकारी आणि न.पा. आरोग्य अधिकारी यांनी एफआयआर दाखल करण्याच्या धमक्या देणे बंद न केल्यास अंगणवाडी कर्मचारी कोणत्याही क्षणी कोरोनाचे काम बंद करतील आणि होणार्या परिणामांना प्रांताधिकारी तसेच न.पा.आरोग्य अधिकारी यांची जबाबदार राहतील असा इशारा संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांनी दिला आहे.