हॉटेलचे शटर वाकवून चोरट्याने लांबविली रोकड; चोरटा सीसीटीव्हीत कैद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत हॉटेलचे शटर वाकवून ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरातील हॉटेलमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना सोमवारी २७ मार्च रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी गल्ल्यातील १७ हजारांची रोकडसह सीपीयू चोरुन नेला. ही संपुर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शनिपेठेत चेतन अनिल वाणी हे वास्तव्यास असून त्यांची ममुराबाद रोडवरील प्रजापत नगर येथे मितवा नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता चेतन वाणी यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण करुन ते झोपून गेले. सोमवारी २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे हॉटेल उघडण्यासाठी आले असता, त्यांना हॉटेलच्या शटरचे एका बाजूने थोडे उचकवलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी शटरचे कुलूप उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना काऊंटरमधील चिल्लर व चाव्या ह्या काऊंटरवर दिसल्या. त्यांनी लागलीच गल्ल्याची तपासणी केली. यावेळी त्यांना गल्ल्यात ठेवलेली १७ हजारांची रोकड व हॉटेलमधील सीपीयू दिसून आला नाही. या घटनेनंतर चेतन वाणी यांनी तालुका पाोलीस ठाण्यात फोनद्वारे चोरी झाल्याचे सांगितले. दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content