पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी निधीची तरतूद

पात्र लाभार्थ्यांना शालेय खर्चासाठी मिळणार मदत ; प्रस्ताव सादर करा- जिल्हा प्रशासनाचे आवाहन

*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |* – कोरोना संसर्ग काळात संसर्गामुळे एक वा दोन्ही पालकत्व गमावलेल्या नोंदणी झालेल्या ७९० बालकांना त्याच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी खर्चासाठी निधीची तरतूद जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे, प्रस्ताव संबंधित तालुकास्तरावर प्रशासनाकडे सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकीर्ण प्रकरण ३७७/२०१८ (श्वेता.ता.दणाणे वि केद्र शासन व
इतर) मध्ये दि. २० ऑक्टोबर २०२१ रोजी देण्यात आलेले आदेश व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महिला व बाल विकास
विभागाच्या बाल न्याय विभागाकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जळगाव यांच्या खात्यात निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग काळात संसर्गामुळे एक पालकत्व गमावलेल्या ७६३ आणि दोन्ही पालकत्व गमावलेल्या २७ अशा एकूण ७९० नोंदणी झालेल्या बालकांना बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. १८ वर्ष वयोगटातील बालकांच्या शालेय शुल्क, वसतिगृह शुल्क, शैक्षणिक साहित्य खरेदी खर्चासाठी प्रति बालक कमाल मर्यादा १० हजार रुपये निधी बँक खात्यावर वर्ग  केले जाणार आहे.

पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तालुका तहसीलदार, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव या कार्यालयात विहित अर्ज तसेच अर्थसहाय्यासाठी अर्जासोबत आई, वडील कोविड १९ मुळे मयत झाल्याबाबतचा पुरावा, कोविड पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्टची झेरॉक्स प्रत, लाभार्थी बालकाचे आधारकार्ड, बँक पासबुक, शाळेचा पुरावा आदी झेरॉक्स प्रती आवश्यक कागदपत्र प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सदस्य सचिव, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!