अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांकडून मंडळाधिकारी यांच्याशी धक्काबुक्की (व्हिडीओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या बैलगाडीवर मंडळाधिकारी यांनी कारवाई केली. याचा राग आल्याने बैलगाडीधारकासह इतर दोन जणांनी मंडळाधिकारी व इतर कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याची प्रकरणी १९ मे रोजी सकाळी ९ वाजता तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कानळदा गावानजीक असलेल्या गिरणनदी पात्रातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक बैलगाडीतून होत असल्याची गोपनीय माहिती जळगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना मिळाली. मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार मंडळाधिकारी यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी किशोर ठाकरे व मनोज कोळी यांनी कानळदा गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा समोरून चोरीची वाळू वाहतूक करणारी बैलगाडी पकडली. यावेळी वाहतूक करणाऱ्या बैलगाडीधारकाला वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता त्यांच्याकडे परवाना नसल्याने बैलगाडी ही तहसील कार्यालयात आणा, असे सांगितले. याचा राग आल्याने बैलगाडीधारक मनोज रतन पारधी, त्याची पत्नी सुनंदा मनोज पारधी आणि मुलगा दीपक मनोज पारधी यांनी मंडळाधिकारी किरण बाविस्कर यांच्यासह कर्मचाऱ्यांशी धक्काबुक्की करून हुज्जत घातली. त्यानंतर बैलगाडी घेऊन पसार झाला, या संदर्भात किरण बाविस्कर यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मनोज रतन पारधी, दीपक मनोज पारधी, सुनंदा मनोज पारधी सर्व रा. कानळदा ता.जि. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.

Protected Content