Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लवकरच होणार केळी विकास महामंडळाची स्थापना- फलोत्पादन मंत्र्यांची घोषणा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आलेल्या केळी महामंडळाची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांनी विधानपरिषदेत केली. तर, ना. गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात केलेल्या चर्चेनुसार पहिल्या टप्प्यात महामंडळासाठी ५० कोटी रूपयांचा निधी मिळणार असून अधिकारी आणि कर्मचार्‍यांसह १५ जणांचा कर्मचारीवृंद या महामंडळाला मिळणार आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी केळी विकास महामंडळाला मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्याच जळगाव दौर्‍यात १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र यानंतर राज्य शासनातर्फे या संदर्भात अद्याप देखील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. मध्यंतरी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे यावल येथे भूमीपुजनाच्या कार्यक्रमासाठी गेले असता त्यांनी आपल्या भाषणात नियोजीत केळी विकास महामंडळाला दिवंगत नेते हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते.

हे देखील वाचा : फळबाग लागवड योजनेत केळीला फळाचा दर्जा !

दरम्यान, या अनुषंगाने आज विधानपरिषदेत केळी विषयावर चर्चा झाली. यात केळी विकास महामंडळाबाबत रणजीतसिंह मोहिते पाटील आणि आ. एकनाथराव खडसे यांनी प्रश्‍न उपस्थित केला. यावर राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांनी केळी विकास महामंडळ लवकरात लवकर अस्तित्वात येणार असून आपली या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे ना. भुमरे म्हणाले. यामुळे आता लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आजच केळी विकास महामंडळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यात लवकरच महामंडळ कार्यरत होणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात साधारणपणे ५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात येणार आहे. तसेच यात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह एकूण १५ कर्मचारीवृंदाची तरतूद देखील करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा : केळी विकास महामंडळाला मिळणार हरीभाऊ जावळेचे नाव !

राज्य सरकारने केळी विकास महामंडळाची स्थापना केल्याची बाब जळगाव जिल्ह्यासाठी खूप महत्वाची आहे. जळगाव जिल्हा केळीचे आगार म्हणून समजला जातो. केळी उत्पादकांना अनेक समस्या भेडसावत असून याचे निराकरण करण्यासाठी एकाच ठिकाणी संशोधनासह मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी पहिल्यांदा या संदर्भातील प्रस्ताव पाठवून याबाबत मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणली. यानंतर हे महामंडळ प्रत्यक्षात साकारावे यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. याचमुळे आज महामंडळाच्या स्थापनेबाबत फलोत्पादन मंत्र्यांनी अधिकृत घोषणा केली.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, केळी विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी प्रस्ताव पाठविण्यापासून ते प्रत्यक्षा साकार होण्यापर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहणार आहे. आज ना. संदीपान भुमरे यांच्या घोषणेमुळे आपण केळी विकास महामंडळाच्या स्थापनेच्या एक पाऊल अजून जवळ आलो असून साधारणपणे दोन महिन्यात हे महामंडळ प्रत्यक्ष साकारण्यात आलेले असेल असा मला विश्‍वास वाटतो.

Exit mobile version