Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फळबाग लागवड योजनेत केळीला फळाचा दर्जा : ना. गुलाबराव पाटलांची वचनपूर्ती

मुंबई / जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केळी पीकाला फळाचा दर्जा देण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून राज्य शासनाच्या फळबाग लागवड योजनेत केळीला फळाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे.

 

केळीला फळाचा दर्जा मिळावा यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या आठवड्यातच रोहयो आणि फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे यांची भेट घेतली होती. याला यश लाभले असून या माध्यमातून जिल्ह्यातील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा निर्णय जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी अतिशय क्रांतीकारी असून आता आपले पुढचे लक्ष्य हे केळी महामंडळाची निर्मिती असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  केले आहे. तर केळी उत्पादकांच्या हितासाठी आपण कटीबध्द असल्याचेही ना. पाटील यांनी आवर्जून नमूद केले आहे.

 

जळगाव जिल्हा हा केळीचे आगार मानले जात असला तरी केळीला फळाचा दर्जा नसल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी कुचंबणा होत आहे. याचा सर्वात मोठा फटका हा फळपीक विम्यात बसत असून यामुळे प्रक्रिया उद्योगात केळी उत्पादकांना विविध योजनांच्या लाभापासून वंचीत रहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केळी पीकाला फळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी विडा उचलला आहे. या अनुषंगाने त्यांनी गेल्या आठवड्यातच राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री ना. संदीपान भुमरे यांच्या दालनात बैठक घेतली होती. यामध्ये त्यांनी केळीला फळाचा दर्जा मिळावा अशी आग्रही मागणी केली. यावर ना. भुमरे यांनी सकारात्मक निर्णय घेणार असल्याची ग्वाही दिली होती.

 

यानंतर काही दिवसांनी अर्थात आज उपमुख्यमंत्र्यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात विकासाची पंचसूत्री मांडतांना कृषी क्षेत्रातील तरतुदीमध्ये रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत फळ लागवड योजनेत केळी, द्राक्षे, ड्रॅगन फ्रुट, अव्हॅकॅडो आदींचा समावेश केला आहे. विशेष बाब म्हणून या योजनेत यंदा केळीचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आलेला आहे. अर्थात, या माध्यमातून केळीला फळाचा दर्जा मिळण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक मोठे ठोस पाऊल टाकले आहे.

 

या संदर्भात ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, फलोत्पादन खात्याच्या फळबाग लागवड योजनेत केळीचा फळ म्हणून झालेला समावेश हा अतिशय क्रांतीकारी निर्णय असून याचा जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांना नक्की लाभ होणार आहे. एकीकडे ना. अजितदादा पवार यांनी पीक आणि फळपीक विमा योजनांबाबत नव्या पर्यायांचा विचार सुरू केला असतांना याच सोबत केळीला फळाचा दर्जा मिळणे या बाबी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा देणार्‍या ठरणार्‍या आहेत. आता केळी महामंडळ सुरू करण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे. या संदर्भात लवकरच महामंडळ स्थापनेचा निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. या माध्यमातून केळी हे प्रमुख पीक असणार्‍या जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने केळी पीक घेण्यासाठीचे समस्त मार्गदर्शन तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. केळी उत्पादकांच्या हितासाठी आपण कटीबध्द असून केळीला पूर्णपणे फळाचा दर्जा मिळवणे आणि केळी महामंडळ स्थापन करणे हे आपले उद्दीष्ट्य आहे. हे केल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Exit mobile version