Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचार्‍यांची फरफट : बदलीसाठी पुन्हा बोलावले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कडाक्याच्या उन्हात जिल्हाभरातील आरोग्य कर्मचार्‍यांना बदलीसाठी बोलावून त्यांना दुपारी परत पाठविण्याचा प्रकार आज जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात घडला असून यामुळे कर्मचारी संतप्त झाले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बदल्यांसाठी आज जिल्हाभरातून सुमारे तीनशे स्त्री-पुरूष कर्मचार्‍यांना आज जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले होते. यामुळे संबंधीत सर्व कर्मचारी ही सर्व कामे सोडून आज जिल्हा परिषदेत आले होते. मात्र येथे बदल्यांच्या याद्याच तयार नसल्याने या सर्व कर्मचार्‍यांना थांबविण्यात आले. बराच काळ गोंधळ सुरू राहिल्यानंतर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या सर्व कर्मचार्‍यांना पुढील मंगळवारी बोलावण्यात आले.

सध्या अतिशय कडाक्याचा उन्हाळा सुरू असून जळगावात विक्रमी उच्चांकी तापमान असतांना जिल्हाभरातून आलेल्या कर्मचार्‍यांना आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे. तसेच त्यांना कडाक्याच्या उन्हातच घरी परत जावे लागले आहे. जर बदल्यांच्या प्रक्रियेची पूर्तताच झाली नसले तर जिल्हाभरातील कर्मचार्‍यांना कुणी आणि कशासाठी बोलावले ? त्यांची पिळवणूक कशासाठी करण्यात आली ? हे प्रश्‍न आता विचारण्यात येत आहेत. या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

Exit mobile version