Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळकर तरूण लढवतोय ब्रिटनमध्ये निवडणूक !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मूळ भुसावळकर असलेला निनाद ओक हा ब्रिटनमधील सॅलफर्ड सिटी काऊन्सीलमध्ये निवडणूक लढवत असून याचा निकाल उद्या लागणार आहे.

 

‘आपले गजाभाऊ’ म्हणजे अर्थातच दिवंगत गजाभाऊ ओक हे कोण ? हे भुसावळातील तरूणाईला कदाचीत माहित नसेल. तथापि, अनेक दशके भुसावळच्या सार्वजनीक जीवनात सर्वत्र आघाडीवर असणारे नाव म्हणजेच गजाभाऊ ओक यांची ख्याती होती. याचमुळे शहरवासियांनी त्यांना मोठ्या आत्मीयतेने ‘आपले गजाभाऊ’ ही उपाधी दिली होती. त्यांच्या समाजकार्याचा वारसा हे त्यांचे चिरंजीव विवेक ओक हे समर्थपणे सांभाळत आहेत. आता त्यांच्याच कुटुंबातील तिसरी पिढील ही थेट ब्रिटनमध्ये आपली कर्तबगारी दाखविण्यासाठी सज्ज झालेली आहे.

भुसावळातील सौ. राजश्री आणि विवेक ओक यांचे चिरंजीव निनाद ओक हे ब्रिटनच्या मँचेस्टर शहराच्या अंतर्गत येणार्‍या सॅलफर्ड शहरात सध्या वास्तव्यास आहेत. माहिती तंत्रज्ञान विषयात बी. ई. पूर्ण केल्यानंतर टेक महिंद्रा या ख्यातप्राप्त कंपनीत ते रूजू झाले. याच कंपनीच्या माध्यमातून ते सध्या ब्रिटनमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान, नोकरी निमित्त स्थायीक झालेल्या शहराच्या स्थानिक राजकीय आणि सामाजिक घडामोडींमध्ये त्यांना रस निर्माण झाला. ते लिबरल डेमोक्रॅटस या पक्षासोबत जुडले. आणि याच पक्षाने त्यांना सॅलफर्ड सिटी काऊन्सीच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षातर्फे तिकिट दिले आहे. या शहरात २० जागांसाठी एकंदरीत ८९ उमेदवार हे जनतेचा कौल मागत आहेत.

निनाद ओक हे ‘कॅडीशेड अँड लोअर इर्लेम’ या वॉर्डातून लिबरल डेमोक्रॅटस या पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना कॉंझरव्हेटीव पक्षाचे जॅकी माऊंटेन आणि लेबर पक्षाचे हना रॉबीन्सन-स्मिथ यांनी आव्हान दिले आहे. अर्थात येथे तिरंगी लढत होत आहे. या निवडणुकीसाठी गुरूवार दिनांक ४ मे रोजी मतदान होत आहे. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून यानंतर याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भुसावळकर निनाद ओक हा बाजी मारणार का ? याबाबत आता मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

Exit mobile version