वाळूच्या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना येथे घडली आहे.

गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरचे टायर फुटल्याने वाहन महामार्गावरील खांबावर आदळल्याने ट्रॅक्टर पल्टी होऊन चालकाच्या डोक्याला जबरी मार लागला. त्यात २० वर्षाचा युवक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान भडगाव रोडवरील हॉटेल स्वप्नशिल्प समोर घडली. मयत युवकाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले. यावेळी संपूर्ण गाव शोकाकुल झाले होते.

‌चिंचखेडा खु तालुका पाचोरा येथील पवन हिम्मत पाटील (वय – २०) वर्ष हा कृष्णापूरी येथील एका इसमाचे ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान गिरणा नदीपात्रातून वाळू भरुन पाचोरा शहराकडे भरधाव वेगाने येत असतांना हॉटेल स्वप्नशिल्प समोर अचानक टायर फुटला त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रॉक्टर चांदवड – जळगाव महामार्गावरील इलेक्ट्रीक खांबावर आदळले व पल्टी झाले त्यात पवन हिम्मत पाटील यांच्या डोक्याला व चेहर्‍याला जबरी मार लागला. त्यात पवन हा जागेवर ठार झाला.

धक्कादायक बाब म्हणजे घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधीत वाहन मालक व त्याच्या साथीदारांनी तात्काळ तुटलेला खांब व वाळू दुसर्‍या वाहनात भरुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पवन हा आई वडीलास एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील हिम्मत पाटील हे सारोळा बु ता. पाचोरा येथील अविनाश देशमुख यांचेकडे मजूरी करतात. पवन यास एक बहिण व वृद्ध आई – वडील असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Protected Content