Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भोरस येथे किरकोळ कारणावरुन एकाला मारहाण

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भोरस येथील २६ वर्षीय तरूणाला किरकोळ कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, सुरेश संजय जगताप (वय-२६) रा. भोरस ता. चाळीसगाव हा वरील ठिकाणी आपल्या आई-वडिलांसह वास्तव्यास आहेत. दरम्यान खासगी कामानिमित्त सुरेश हा चुलत भाऊ विजय जगताप यांच्यासोबत ६ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहरात आला. काम आटोपून दोघेही दुचाकीवरून घरी जात असताना धुळे रोडवरील विराम लॉन्ससमोर चहा घेण्यासाठी थांबले. त्याठिकाणी गावातील शरद संतोष पाटील, लखन वाणी व गोलू (पूर्ण नाव माहीत नाही) आदी उपस्थित होते. त्यावेळी लखन वाणी यांच्या अंगावर कपडे नसल्याने सुरेश यांनी विचारपूस केली. तेवढ्यात शरद पाटील यांनी सुरेश याला जातीवाचक शिवीगाळ करायला सुरुवात केली. लागलीच सुरेश यांनी चुलत भावाला सोबत घेऊन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल करण्यासाठी तेथून निघून आले.

परंतु ग्रामीण पोलीस स्थानकाकडे जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वळनावर गावातील अमोल धनराज सोनवणे व जयदीप पाटील हे उभे होते. त्या दोघांनी याबाबत विचारणा करीत असताना अचानक शरद संतोष पाटील त्याठिकाणी आला. व समोर पडलेला दगड उचलून सुरेश याच्या कपाळावर मारून जबर दुखापत पोहोचली. लागलीच चुलत भाऊ यांनी सुरेशला औषधोपचारकामी चाळीसगाव येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर सुरेश संजय जगताप यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ३२६, ५०४, ५०६, ३(१)(आर), ३(१)(एस) अशा विविध कलमान्वये शरद संतोष पाटील रा. भोरस ता.चाळीसगांव याच्याविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

 

Exit mobile version