Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

योगी आदित्यनाथांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा- प्रियंका

लखनऊ वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधव-वधेरा यांनी केला आहे.

हाथरस जिल्ह्यातील चंदपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात १४ सप्टेंबर रोजी या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, संदीप, रामू, लवकुश आणि रवी, अशी आरोपींची नावे आहेत. दिल्लीत सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी पीडितेचा मृत्यू झाला. यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे.

सर्वात भयंकर बाब म्हणजे पोलिसांनी हाथरस येथे मध्यरात्री जबरदस्तीने अंत्यसंस्कार केले. पोलिसांच्या या भूमिकेवरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा राजीनामा मागितला आहे.

प्रियंका गांधी यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, रात्री अडीच वाजता कुटुंबीयांनी विनवणी केली पण हाथरस पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने यूपी प्रशासनाने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिले नाही, जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत. याचबरोबर, पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुबीयांकडून मुलीच्या अंत्यसंस्काराचा हक्क काढून घेतला आणि मृताला सन्मान दिला नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच, मोठी अमानुषता, तुम्ही गुन्हेगारी थांबवली नाहीत, उलट तुम्ही गुन्हेगारांसारखी वर्तवणूक केली. अत्याचार थांबवला नाही, एक निष्पाप मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा दुप्पट छळ केला, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

Exit mobile version