Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

येणारे दिवस आव्हानात्मक : मुख्यमंत्र्यांचा इशारा

 

 

मुंबई प्रतिनिधी | कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरी याचे सावट पूर्णपणे दूर झालेले नसून येणारे दिवस हे आव्हानात्मक असल्याच इशारा आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिला. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य आपत्ती व्यवस्थापनाची बैठक पार पडली. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करीत आहे की, आता अधिक काळजी घ्या. गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू. सण, उत्सव आज झाले नाहीत तर उद्या नक्की येतील, पण घरातला प्रत्येक माणूस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. लोकांच्या जिवावरील विघ्न टाळायचे असेल तर, शासनाने वेळोवेळी आखून दिलेल्या आरोग्याच्या नियमांचे पालन होईल हे काटेकोरपणे पहा, गर्दी करू नका. सार्वजनिक कार्यक्रम टाळा. राजकीय सभा, संमेलनांना उत्तेजन देऊ नका, हीच त्या विघ्नहर्त्या श्री गणेशाची इच्छा असेल असे ठाकरे म्हणाले.

 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मला वारंवार आपणांस हे आवाहन एवढ्याचसाठी करावे लागते आहे, कारण कोविड परत वाढतोय. येणारे दिवस आव्हानात्मक असतील आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नसेल तर विशेषतः सर्व राजकीय पक्षांवर त्याची प्रमुख जबाबदारी आहे. दुसर्‍या लाटेची सुरुवात कशी झाली त्याची आपणास पूर्ण कल्पना आहे. या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाला देखील यातून जावे लागले होते. सरकार सुविधा निर्माण करील, पण त्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करा असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रसंगी केले.

Exit mobile version