Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत साकळीचा तरूण ठार

यावल प्रतिनिधी | अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील साकळी येथील युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना रात्री घडली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील साकळी येथील इंदिरानगर प्लॉट भागातील रहिवासी रोहित अरुण कोळी हा सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्रमांक एमएच.१४-जे एन.२६८५) साकळी येथून किनगावकडे जात होता. अंकलेश्वर – बर्‍हाणपूर मार्गावरील साकळी गावाच्या पुढील भारत टोलनाका समोरील वळणावर चोपड्याकडून भरधाव येणार्‍या अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रोहित कोळी हा जागीच ठार झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दीपक पाटील, सचिन चौधरी, नूतन बडगुजर यांनी रोहितचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणून पोलिसांना माहिती दिली. या अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी, संजय देवरे, नरेंद्र बागूल, चंद्रकांत पाटील, राहुल चौधरी यांनी सर्वत्र नाकाबंदी करून तपासणी केली. पण, उपयोग झाला नाही. मात्र, धडक देणारे वाहन शोधून काढू असे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात तपास सुरू आहे.

रोहित कोळी हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहिणी असा परिवार आहे. रात्री उशिरापर्यंत या अपघात संदर्भात यावल पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Exit mobile version