Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘त्या’ ग्रामसेविकेला कोर्टाचा दिलासा : जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती

यावल प्रतिनिधी | पदभार सोडतांना दप्त देण्यास टाळाटाळ केल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी एक महिन्याचा दिवाणी कारावास सुनावलेल्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना खंडपीठाने दिलेसा देत या आदेशाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी आता २४ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

याबाबत वृत्त असे की, चुंचाळे येथील ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर या पूर्वी किन्ही (ता.भुसावळ) येथे कार्यरत होत्या. तेथून बदली झाल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीचे कार्यालयीन दस्तऐवज दुसर्‍या ग्रामसेवकाकडे देण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अलीकडेच एका आदेशाच्या माध्यमातून त्यांना ३० दिवस दिवाणी तुरूंगवासाच्या शिक्षेचे आदेश केले होते. या आदेशाच्या विरोधात प्रियंका बाविस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपील दाखल केले होते.

खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.एन.लढ्ढा व एस.व्ही.गंगापुरवाला यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यात प्रियंका बाविस्कर यांनी आपण २०१५ साली किन्ही येथे ग्रामसेविका म्हणून रूजू झालो होतो. येथील कार्यकाळ संपल्यानंतर आपण किन्ही येथील ग्रामसेवक पदाचा कार्यभार अनुक्रमे काकरवाल आणि संदीप निकम यांच्याकडे सोपविले. याचसोबत सर्व कागदपत्रे त्यांच्याकडे क्रमाक्रमाने सुपुर्द केले असल्याचे प्रतिपादन केले. या सुनावणीनंतर न्यायमूर्तींनी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

आता या प्रकरणाची २४ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून यात जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भुसावळचे गटविकास अधिकारी यांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार आहे. यामुळे आता यात पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version