Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आश्रमशाळेत निकृष्ट भोजन; विद्यार्थ्यांची १२ किलोमीटर पायपीट

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथील मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेत निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार करण्यासाठी संतप्त विद्यार्थ्यांनी १२ किमी पायी चालत प्रकल्प कार्यालय गाठले.

याबाबत वृत्त असे की,आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत मनवेल येथील अनुदानित आश्रम शाळेत निकृष्ट जेवण मिळत असल्याची तक्रार करण्यासाठी संतप्त विद्यार्थी १२ किमी पायी चालले. इयत्ता आठवी ते दहावीच्या ३१ विद्यार्थ्यांनी मनवेल ते यावल अशी पदयात्रा करत रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास प्रकल्प कार्यालय गाठले.

दरम्यान, रविवारी सुटी असल्याने प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे-पाटील यांच्या आदेशाने सहायक प्रकल्प अधिकारी एन.बी.झंपलवाल यांनी विद्यार्थ्यांची तक्रार ऐकून घेतली. तसेच संस्थेचे अधीक्षक आणि शिक्षकांची कानउघाडणी करून वरिष्ठांकडे अहवाल देण्याची तंबी दिली. संबंधितांवर कारवाई करून समस्या सोडवण्याचे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर विद्यार्थी पुन्हा मनवेल येथील आश्रमशाळेत वाहनाने रवाना झाले.

मनवेल येथील आश्रमशाळेत रविवारी सायंकाळी खिचडी तयार केली होती. ती बेचव असल्याची तक्रार करत विद्यार्थी थेट प्रकल्प कार्यालयात धडकले. तसेच विद्यार्थ्यांनी बेचव खिचडीच नमुना अधिकार्‍यांना दाखवला. त्यामुळे विद्यार्थ्यांची तक्रार येता कामा नये, असे स्पष्ट निर्देश अधिकार्‍यांनी शिक्षकांना दिले. तसेच विद्यार्थ्यांना यावलहून वाहनाद्वारे आश्रमशाळेत रवाना केले.

Exit mobile version