Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यावल तालुक्यात काँग्रेस व भाजपमध्ये जोरदार चुरस

यावल प्रतिनिधी । येथील तालुक्यातील ग्राम पंचायतच्या सार्वत्रीक पंचवार्षिक निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली असुन, आतापर्यंत लागलेल्या निकालात काँग्रेस पक्षाला दहा तर भाजपला चार ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाल्याचे दिसून आले आहे. तर एका ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला यश लाभले आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत लागलेल्या निकालात मारूळ, बामणोद, किनगाव, वढोदे प्र यावल, अट्रावल, दहीगाव, डोंगर कठोरा, हिंगोणा, कोळवद या ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व दिसून आले आहे. तर स्व .आमदार हरीभाऊ जावळे यांच्या भालोद गावात भाजपाला बहुमत मिळाले आहे. यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल चौधरी यांच्या वनोलीतही भाजपाचे वर्चस्व सिद्ध झाले असुन , भाजपाच्या यावल पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी पुरूजीत चौधरी यांचे पती व डांभुर्णी गावाचे विद्यमान सरपंच पुरूजीत गणेश चौधरी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळवुन बहुमत मिळवले आहे.

सातोद ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदचे माजी सदस्य हर्षल गोवींदा पाटील यांच्या भाजपा प्रणीत प्रगती पॅनलने बहुमत मिळवले. राजोरा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व तर चिंचोली ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणी शिवसेना प्रणीत महा विकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.

या ग्रामपंचायत निवडणुकीत यावल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या पत्नी दिपाली शेखर पाटील यांचा सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पराभुत झाल्या. तर किनगाव ग्राम पंचायत निवडणुकीत माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी यांच्या सुन सौ. मालती राजेन्द्र चौधरी या विजयी झाल्या आहेत. बामणोद ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष व माजी पंचायत समितीचे सभापती डॉ. नरेन्द्र वामन कोल्हे यांच्या पत्नी सौ. सुवर्णलता नरेन्द्र कोल्हे यांचा आणी त्यांच्या सुन सुजाता कोल्हे यांचा पराभव झाला आहे.

Exit mobile version