Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जल जीवन मिशनच्या कामात भाजप-सेनेत श्रेयवादाची लढाई

यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील गावांचा जलजीवन मिशनमध्ये समावेश करण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा जि.प. सभापतींनी केल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन यासाठी आमदार लताताई सोनवणे यांची प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. यामुळे आता यावरून भाजप व शिवसेनेत श्रेयवादाची लढाई रंगल्याचे दिसून आले आहे.

जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी साकळी गटातील गावांचा जलजीवन योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न केल्याचे जाहीर केले होते. शिवसेनेतर्फे तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी बाजार समितीच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन याचे खंडन केले आहे. चोपडा मतदारसंघाच्या आ. लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आणी जिल्ह्याचे पालकमंत्री ना . गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले असुन , यशातुन भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवीन्द्र पाटील यांनी या कामांचा श्रेय लाटण्यासाठी खोटे प्रचार केल्याचे आरोप शिवसेने जिल्हा उपप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केला.

याप्रसंगी मुन्ना पाटील म्हणाले की, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. जळगाव जिल्ह्यातील प्रलंबीत अपूर्ण व प्रस्तावित केलेल्या पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक पार पडुन या बैठकीत आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा मतदारसंघातील चोपडा व यावल तालुक्यातील विविध योजना जलजीवन मिशन अंर्तगत अडावद साठी ३५.०० कोटी, लासुर व ९ गावांसाठी ३५.०० कोटी, धानोरासाठी २१.५० कोटी तसेच चोपडा तालुक्यातील ४० गावांसाठी १४.७६ कोटी व यावल तालुक्यातील १५ गावांसाठी ५.७४ कोटी इतक्या निधीची तरतूद करून या योजनांचा जलजीवन मिशन आराखड्यात समावेश करण्यात आलेला आहे. चोपडा व यावल तालुक्यातील अनुक्रमे २२ व ९ गावे, व आदिवासी वाडे / वस्त्यासाठी ७.०० लक्ष रुपये किमतीचे दुहेरी हातपंपासाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.

आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे व कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग यांना दि.०९ एप्रिल २०२० व १३ एप्रिल २०२० अन्वये पत्रव्यवहार व पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांना दि.१० जुलै २०२० रोजीच्या पत्रान्वये जलजीवन मिशन आराखड्यात संबंधित गावांचा समावेश होण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार दि.०८ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील अपूर्ण व प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक पार पडली त्या बैठकीत चोपडा मतदारसंघातील आमदार लताताई सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या मागण्यांना मंजुरी देण्यात आल्याची माहीती पत्रकार परिषदेत देतांना तुषार पाटील यांनी सांगीतले त्यानुसार २२ जानेवारी रोजी जळगाव येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जलजीवन मिशन जिल्हास्तरीय बैठकीत वरील ६७ योजनांचा जलजीवन मिशन अंतर्गत समावेश करण्यात आल्याने चोपडा मतदारसंघातील गावांचा २०२४ पर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल.

मुन्ना पाटील पुढे म्हणाले की, भाजपाच्या मंडळीकडुन त्यांनी न केलेल्या कामांचे क्षेत्र लाटण्याचे प्रकार करण्यात येत असल्याचे आहे. जर जिल्हा परिषदेचे सभापती रवीन्द्र पाटील, आणी जिल्हा परिषदच्या सदस्या सविता भालेराव यांनी श्रेयवाद लाटण्याचे काम केले आहे. गत चार वर्षात भाजपाचे तिन पालकमंत्री होवुन गेलीत त्याच वेळीला ही कामे भाजपाच्या मित्रमंडळींना का करता आली नाही? असा प्रश्‍न देखील परिषदेत उपस्थित करून त्यांनी आमदार यांनी या सर्व कामांच्या पाठपुरावा केल्याचे पुरावे सादर केलेत. या पत्रकार शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार ( मुन्ना ) सांडुसिंग पाटील , शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवीन्द्र सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडु घनश्याम पाटील, शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख शरद कोळी, संघटक पप्पु जोशी आदी उपस्थित होते.

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे आता जल जीवन मिशनच्या कामांवरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version