पालकमंत्र्यांच्या व्यासपीठावर अमोल जावळे; नव्या समीकरणांच्या नांदीने चर्चेला उधाण

यावल प्रतिनिधी । पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बोरावल येथील कार्यक्रमात दिवंगत हरीभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या बेरजेच्या राजकारणाच्या माध्यमातून काही नवीन समीकरण तर उदयास येणार नाही ना ? याची चर्चा आता सुरू झाली आहे.

माजी खासदार, आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या अकाली निधनानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा नेमकी कुणाकडे जाणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली असतांना आता येथील हालचाली गतीमान होऊ लागल्या आहेत. हरीभाऊंचे चिरंजीव अमोल जावळे हे उच्चशिक्षीत असून कार्पोरेट क्षेत्रात वरिष्ठ पातळीवर काम करत आहेत. त्यांना भाजप पाठबळ देणार असल्याची चर्चा होती. तर स्वत: अमोल जावळे यांनी आपले मनसुबे अद्याप तरी खुले केलेले नाहीत. या पार्श्‍वभूमिवर शुक्रवारी सायंकाळी यावल तालुक्यातील बोरावल या गावातील एका कार्यक्रमात त्यांनी लावलेली हजेरी ही कुतुहलाचा विषय बनली आहे. खरं तर, बोरावल गावातील विकासकामांच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनणे स्वाभाविक आहे. कारण या व्यासपीठावर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे तमाम पदाधिकारी उपस्थित असतांना अमोल जावळे यांची हजेरी ही चर्चेला आमंत्रण देणारी ठरली आहे.

लक्षणीय बाब म्हणजे या कार्यक्रमाआधी यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या कार्याचा गौरव केला होता. याप्रसंगी भाजपच्या पदाधिकार्‍यांचाही सत्कार करण्यात आला. यानंतर दोन तासांमध्ये त्यांचे पुत्र पालकमंत्र्यांच्या सोबतीने शिवसेनेच्या व्यासपीठावर विराजमान झाले. यातून परिसरात काही नवीन राजकीय समीकरण उदयास येत आहे का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

खरं तर, भाजप व शिवसेनेत अत्यंत कटुतेचे संबंध असतांना यावल तालुक्यात मात्र बाजार समिती, नगरपालिका आदी माध्यमांमधून अजूनही युती अबाधित असल्याची बाब लक्षात घेतली तर नवीन समीकरण सहजशक्य असल्याचे जाणकारांचे मत आहे. यातच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघात बेरजेचे राजकारण सुरू केले आहे. भुसावळ येथील मनोज बियाणी आणि त्यांच्या सहकार्‍यांना दिलेले पाठबळ हे याचेच उदाहरण आहे. तर याच्या पाठोपाठ आता त्यांच्या सोबत थेट अमोल हरीभाऊ जावळे यांनी दिलेली उपस्थिती लक्षणीय आहे.

या संदर्भात अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, माझ्या बाबांचे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी अतिशय सलोख्याचे संबंध होते. यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सोबतही आमचे अतिशय जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. तसेच बोरावल येथील कार्यक्रम हा विकासकामांचा होता. यात माझ्यासोबत भाजपचे अनेक पदाधिकारी देखील होते. यामुळे माझ्या कार्यक्रमातील उपस्थितीचा कुणी राजकीय अर्थ काढू नये असे त्यांनी नमूद केले. अर्थात, असे असले तरी अमोल जावळे यांची पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला हजेरी ही लक्षणीय असल्याचे मानले जात आहे.

yawal programme

Protected Content