Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नवीन ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत:सह पक्षाचा लौकीक वाढवावा-अ‍ॅड. पाटील

यावल प्रतिनिधी । ग्रामपंचायत हा राजकीय प्रणालीचा पाया असून याच्या निवडणुकीद्वारे निवडून गेलेल्या सदस्यांनी चांगली कामे करून स्वत:सह पक्षाचा लौकीक वाढवावा असे आवाहन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्रभैय्या पाटील यांनी केले. ते येथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीतील पक्षाचे नवनिर्वाचित सदस्य, व पत्रकारांचा सन्मान, सत्कार कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले. याच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अ‍ॅड. रोहिणी खडसे खेवलकर, पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील,जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील, विजय पाटील, माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील, सिताराम पाटील, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष एम.बी. तडवी, राकेश कोलते, जिल्हा बँक संचालक प्रशांत चौधरी, द्वारका पाटील, किशोर महाजन, सुकदेव बोदडे, मुकेश येवले, देवकांत पाटील आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शहरातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूकीत पक्षाचे विजयी झालेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत ही राजकीय जिवनाचा पाया असून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गुणात्मक दर्जाचे विकासात्मक कामे करून स्वतः सह पक्षाचा सन्मान वाढवावा. शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन देखील त्यांनी केेले.

याप्रसंगी अतुल पाटील म्हणाले, की निवडणूक जिंकण्यासाठी डावपेच असतात. निवडणूक जिंकणे म्हणजे नावलौकीक मिळविणे नव्हे. जिल्हा बँकेच्या अध्यक्ष अ‍ॅड. रोहिणी ताई खडसे खेवलकर म्हणाल्या, की नाथाभाउंच्या पक्षांतरानंतरही भाजपची भाषा अजून बदललेली नाही. पक्षातील सदस्य व कार्यकर्त्यांनी कामे करतांना कोठेही कमी पडू नका संघटन महत्वाचे आहे. आपण सत्तेत असल्यामुळे ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त निधी मिळेल त्याचे नियोजन करून वापर करा.

यासोबत विजय पाटील, व सुकदेव बोदडे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हेमंत येवले, हितेंद्र गजरे, बापू जासूद, गुणवंत निळ, अरूण लोखंडे, कामराज घारू, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेश येवले यांनी केले तर आभार अ‍ॅड. देवकांत पाटील यांनी मानले.

Exit mobile version