Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामसेवकाला मारहाणीसह शासकीय कामात अडथळा : गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील अकलूद-कासवा ग्रुप ग्रामपंचायतीत कार्यरत असणार्‍या ग्रामसेवकाला मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार प्रविण बळीराम कोळी (वय ३८ वर्ष राहणार भुसावळ ) हे यावल पंचायत समिती अतर्गत येणार्‍या कासवा-अकलूद ग्रुप ग्रामपंतायतीत कार्यरत आहेत. दिनांक २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास प्रविण कोळी हे कासवा ग्रुप ग्रामपंचायतमध्ये आपल्या कार्यालयातील कर्मचारी भगवान पंढरीनाथ कोळी आणि कारकुन संतोष रामचंद्र सपकाळे असे सेवेत कार्यरत असतांना गावातील ग्राम पंचायत सदस्य दशरथ अर्जुन सपकाळे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून ग्रामसेवक प्रविण कोळी यांच्याशी हुज्जत घातली.

दशरथ अर्जुन सपकाळे यांनी मला विचारल्या शिवाय तुम्ही कोणतेच ग्रामपंचायतचे काम करू नका असे बोलुन टेबलावरील रजिस्टर बाजुला फेकुन दिले व ग्रामसेवक करीत असलेल्या शासकिय कामात अडथळा आणुन कामकाज बंद केले. यावर ग्रामसेवक प्रविण कोळी हे त्यास बोलण्यास गेले असता ग्रामपंचायत सदस्य दशरथ कोळी यांने शिवीगाळ करीत चापटा बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली.

याबाबत प्रविण कोळी यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने घटनेशी संबधीत ग्रामपंचायत सदस्य दशरथ सपकाळे याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पुढील तपास सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.

Exit mobile version