Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच घेतांना अटक

यावल/सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अवसायकाला पाच लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज रंगेहात अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतंसंस्थेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे प्रशासकपदाची सूत्रे आहेत. या पतसंस्थेच्या सावदा येथील शाखेत सावदा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या एका व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता. यानंतर गाळा मालकाने फेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधीत गाळा आणि याची अमानत रक्कम ही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम कडू ठाकरे यांनी त्या गाळा मालकाकडे पाच लाख रूपयांची मागणी केली होती.

दरम्यान, सदर गाळा मालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचला. यात आज सकाळी सखाराम कडू ठाकरे ( वय ५६, रा. पाचोरा) यांना धुळे येथे लाच घेतांना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ताज्या वृत्तानुसार त्यांना एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई लाचलुपत प्रतिबंधक खात्याचे निरिक्षक हेमंत बेंडाळे यांच्या मार्गदर्शनाखालील पोनि रूपाली खांडवी, पो. हवा. राजन कदम, शरद काटके, पो. शि. संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक पोहवा सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.

Exit mobile version