Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

यवतमाळ पं.स. निवडणुकीत शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये धक्काबुक्की

यवतमाळ, वृत्तसंस्था | बुधवारी (दि.८) येथील पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठीच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा नेत्यांमध्ये राडा झाला आहे. यावेळी दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये हाणामारी आणि धक्काबुकी झाल्याची चर्चाही आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांनी बंडखोरी केल्यामुळे निवडणुकीदरम्यान गदारोळ झाला होता. काही काळासाठी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

यवतमाळ पंचायत समितीमध्ये शिवसेना चार, भाजप दोन, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक असे संख्याबळ आहे. येथे महाविकास आघाडी आणि भाजपा असा सामना रंगला. पण ऐनवेळी राष्ट्रवादीचा सदस्याने भाजपासोबत घरोबा केला. तसेच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी शिवसेनेतील एका महिलेला आपल्या पाठिंब्यासाठी तयार केले होते. बुधवारी निवडणुकीच्या निमित्ताने भाजपाचे नेते मंडळी शिवसेनेच्या त्या महिलेला घेऊन पंचायत समितीच्या आवारात येताच राडा झाला. शिवसेना कार्यकर्त्यांनी त्या महिलेला जाब विचारला. याच कारणावरून भाजपा आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच झुंपली. दोन्ही पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की, शिवीगाळ व रेटारेटी झाली.

राष्ट्रवादीचे सदस्य नरेश ठाकूर हे भाजपवासी झाले तर शिवसेनेच्या नंदाबाई लडके या देखील भाजपाच्या गोटात सामील झाल्या. दरम्यान एका वृत्तानुसार, भाजपाचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्याम जयस्वाल गट आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड या नेत्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत केले.

Exit mobile version